
सध्या हिवाळा चांगलाच जाणवू लागला आहे. अगदी मुंबईसह सर्वच शहरांमध्ये थंडी चांगलीच जाणवतेय. त्यामुळे आता लोक दिवसभर शक्यतो स्वेटर घालूनच असतात. विशेषतः रात्री थंडीपासून वाचण्यासाठी लोक स्वेटर घालतातच. तर बरेचजण रात्री झोपतानाही स्वेटर किंवा इतर उबदार कपडे घालून झोपतात. ही सवय आरामदायक आणि आनंददायी वाटत असली तरी, आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही पद्धत योग्य नाही. स्वेटरमध्ये झोपल्याने शरीरावर आणि झोपेच्या गुणवत्तेवर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
स्वेटर घालून झोपण्याने काय नुकसान होऊ शकते
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपताना मानवी शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी होते. शरीराच्या तापमानात होणारी ही घट शरीराला आराम देण्यास मदत करते आणि गाढ, शांत झोप घेण्यास मदत करते. पण जेव्हा तुम्ही स्वेटर किंवा जास्त गरम कपडे घालून झोपता तेव्हा ही नैसर्गिक थंड प्रक्रिया विस्कळीत होते. परिणामी, तुमचे शरीर जास्त गरम होऊ शकते, ज्यामुळे रात्री अस्वस्थता जाणवू शकते.
झोपेची गुणवत्ता बिघडू शकते
स्वेटर घालून झोपण्याची एक मोठी समस्या म्हणजे झोपेची खराब गुणवत्ता. तज्ज्ञ म्हणतात की चांगल्या झोपेसाठी बेडरुमचे तापमान हे 18°C ते 21°C दरम्यान असावे. जेव्हा तुमचे शरीर खूप गरम होते, तेव्हा तुम्ही रात्री वारंवार जागे होऊ शकता, अस्वस्थ वाटू शकते, जास्त घाम येऊ शकतो. यामुळे गाढ झोपेत व्यत्यय येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो.
डिहायड्रेशनची समस्या
आणखी एक सामान्य समस्या म्हणजे जास्त घाम येणे आणि डिहायड्रेशन. जेव्हा शरीराला खूप गरम जाणवते तेव्हा ते घामावाटे स्वतःला थंड करण्याचा प्रयत्न करते. झोपताना घाम येणे डिहायड्रेशनचे कारण बनू शकते, ज्यामुळे रात्री शरीर तहानलेले राहते किंवा सकाळी उठल्यावर कोरडे तोंड पडणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
त्वचेच्या समस्या
स्वेटर घालून झोपण्याने कधी कधी त्वचेच्या समस्या उद्धवू शकतात. उबदार कपड्यांमुळे घाम तसाच त्वचेवर राहतो. त्यामुळे अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे, लालसरपणा येऊ शकतो. विशेषतः ज्यांची संवेदनशील त्वचा आहे त्या लोकांना हा त्रास जास्त जाणवू शकतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, झोपताना हलके, श्वास घेण्यायोग्य मोकळे-ढाकळे कपडे घालण्याची आवश्यकता असते. जर तुम्हाला थंडी वाटत असेल तर स्वेटर घालण्यापेक्षा हलक्या ब्लँकेट घेऊन थंडी कमी करण्याचा प्रयत्न करावा.
Leave a Reply