
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करतेय. दीपिकाला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास 13 ते 14 तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर दीपिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. हळूहळू ती बरी होत आहे. अजूनही ती औषधांवरच आहे. नुकताच दीपिकाचा सर्जरीनंतरचा पहिला पेट स्कॅन (PET) करण्यात आला. पती शोएब इब्राहिमसोबत ती पेट स्कॅनसाठी रुग्णालयात पोहोचली होती. शोएबने युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून दीपिकाच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत.
पेट स्कॅनपूर्वी दीपिका थोडी भावूक झाली होती. शोएबने तिला धीर दिला. “तुम्ही कितीही स्ट्राँग असला तरी अशा वेळी भीती वाटतेच. काळजी करू नकोस, सर्वकाही ठीक होईल”, असं आश्वासन तो तिला देतो. तेव्हा दीपिकासुद्धा म्हणते, “होय, थोडीतरी भीती वाटतेच.” पेट स्कॅनच्या आधी दीपिकाने काही ब्लड टेस्ट केले होते. दीपिका आणि शोएब यांना एक मुलगा आहे. मुलाला सांभाळत आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं थोडं कठीण असल्याचंही तिने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं.
शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने अभिनयातून ब्रेक घेतला. त्याऐवजी ती कपड्यांचा आणि दागिन्यांचा व्यवसाय करतेय. यासोबतच ती तिच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. युट्यूब चॅनलवर ती विविध व्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या सासरच्या गावी गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने पोस्ट केले होते. तिथून मुंबईत परतताच ती पतीसोबत पेट स्कॅनसाठी गेली.
पेट स्कॅन (PET Scan – Positron Emission Tomography) हे एक प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आहे, जे शरीरातील टिश्यूज आणि अवयव कसं कार्य करत आहेत, हे पाहण्यासाठी वापरलं जातं. विशेषत: कर्करोग, हृदयरोग आणि मेंदूच्या आजारांचं निदान करण्यासाठी तसंच त्यांच्या उपचारांचा परिणाम कितपत होतोय, हे तपासण्यासाठी याचा उपयोग होतो.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे पोटात सतत दुखायचं. जेव्हा उपचारांनीही हे दुखणं बरं झालं नाही तेव्हा आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यात ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. नंतर समजलं की तो कॅन्सरचा ट्युमर आहे. ही देवाच्या परीक्षेची वेळ आहे, पण यातूनही आम्ही लवकरच बाहेर पडू.”
Leave a Reply