
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सांगतीमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्षप्रवेश झाला आहे. सांगलीमध्ये दोन माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यापैकी एक माजी महापौर हे काँग्रेसचे आहेत तर एक माजी महापौर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. तर 16 माजी नगरसेवक हे दोन्ही पक्षातील आहेत. हा महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
राजकीय जीवनामध्ये मी गेले 35 वर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे. सांगली सातारा या दोन जिल्ह्यांना वेगळी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने महाराष्ट्राला आणि देशाला मोठे नेते दिले आहेत. मान्यवरांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. मात्र काळ बदलतो त्यामुळे नवीन नेतृत्वाला ताकद देण्याचे काम करायचे असते. मी काँग्रेसच्या पंजावर निवडून आलो होतो. मात्र 99 ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. अनेकजण त्या पक्षात गेले. माघे न पाहता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही देखील प्रवेश केला. सांगली महापालिकेमध्ये अनेक लोकांनी नेतृत्व केले. पण शहराचा विकास अजून बाकी आहे. स्वतःच्या उत्पन्नावर महापालिका चालू शकत नाही. केंद्रातून आणि अनेक ठिकाणाहून निधी आणावा लागतो. मेट्रो सिटीची संकल्पना राबवणे सांगली शहराला आवश्यक आहे. जवळपास आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विमानतळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगलीला जर मोठ्या प्रमाणात उद्योग यावे असे वाटत असतील तर विमानतळ असणे गरजेचे आहे. डेव्हलपमेंट गरजेचे आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
तसेच पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाचा पश्चताप होणार नाही, आणि जुन्या कार्यकर्त्यांवर देखील अन्याय होणार नाही अशी या ठिकाणी आमची भूमिका असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply