
दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत पंजाब पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. एका आंतरराज्यीय कारवाईत, पंजाब पोलिसांनी मुंबईतून दोन कुख्यात गुंड-दहशतवाद्यांना अटक केली आहे. साजन मसीह आणि मनीष बेदी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून ते दोघे विदेशात बसलेले दहशतवादी आणि गँगस्टर नेटवर्कशी जोडलेले होते अशी माहिती देखील समोर आली आहे. या कारवाईची माहिती देताना पंजाब पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणाले की, ही कारवाई दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी परदेशातून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कद्वारे पंजाबमध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करत होते.
पोलीस महासंचालकांच्या सांगण्यानुसार, साजन मसीह आणि मनीष बेदी हे दोघे पाकिस्तान स्थित आणि आयएसआय-समर्थित दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा आणि अमेरिकेत अटकेत असलेला गुंड हरप्रीत सिंग उर्फ हॅपी पासिया यांच्या टोळीतील महत्त्वाचे सदस्य होते. दोघे आरोपी दुबई आणि आर्मेनियासह परदेशांतून कारवाया करत होते. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने केलेल्या गुप्तचर माहितीवर आधारित आणि आंतरराज्यीय कारवाईत मसीह आणि बेदी यांना मुंबईत बेड्या ठोकत अटक करण्यात आली. ट
गंभीर गुन्ह्यांमध्ये हात असल्याचा आरोप
आजचा दिवस पंजाब पोलिसांसाठी एक मोठी कामगिरी असल्याचे डीजीपी म्हणाले. साजन मसीह हा डेरा बाबा नामक क्षेत्राशी संबंधित आहे तर मनीष बेदी हा अमृतसरच्या शेर-ए-राइन गँगचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील विविध ठिकाणी झालेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्या दोघांचा समावेश असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी डेरा बाबा नानक आणि बटाला भागातील हत्यांशी जोडलेले आहेत. अमृतसरमध्ये दहशतवादी आणि मुलींवरील हल्ल्यांच्या अनेक घटनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. या घटनांद्वारे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि गुन्हेगारी नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे.
आरोपी परदेशात बसलेल्या त्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावर काम करत होते आणि पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी वेळीच त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं आणि विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे मुंबईत छापा टाकत दोघांनाही अटक केली. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून या तपासातून विदेशी लिंक, फंडिग नेटवर्क आणि इतर साथीदारांबद्दल महत्वाची माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.
Leave a Reply