
ज्यामध्ये रस्ते अपघातांचे सत्र अद्याप सुरुच आहे. त्यातच आता बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळे भीषण अपघात झाले आहेत. या अपघातात चार तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुलढाण्यातील मलकापूर येथे कार झाडावर आदळून तीन मित्रांचा मृत्यू झाला. तर पुण्यातील शिक्रापूरमध्ये ट्रक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
मलकापूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. मलकापूर येथून धुपेश्वरकडे जात असताना तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. धरणगाव जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रुद्र पवार (१९), विनायक अत्तरकार (२०) आणि गणेश इंगळे (२०) अशी या तीन मृतांची नावे आहेत. तर कारमधील इतर दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत युवक मलकापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील चाकण-शिक्रापूर महामार्गावर शिक्रापूर येथे ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधील तरुण देवदर्शन करून चाकणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. ही कार आणि ट्रकची धडक इतकी जोरात होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये कार चालक सागर थोरात याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात इतर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे मलकापूर आणि शिक्रापूर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply