
वाशिममध्ये नुकतीच एक अजब घटना घडल्याचे समोर आले, तिथे सकाळी सकाळी एक कार बेवारस उभी अवस्थेत असलेली आढळली. पण त्या कारची काच फुटलेली होती. घटनेची माहिती मिळताच रिसोड शहर पोलिस तिकडे दाखल झाले,. सोबत श्वानपथकही होतं. बघता बघता या घटनेची माहिती शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि बघ्यांची गर्दी जमा झाली. अनेक जण आपापला कयास लावत होते, अंदाज व्यक्त करत होते. कोणाला वाटला हा अपघात आहे, तर कोणी म्हणत होतं की लूटमार करून कार तशीच टाकून दिली, तर कोणाला वाटलं की आपापासांतील वादातून हा प्रकार घडला. पण नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांनी दिल्यावर सगळेच चक्रावले.
याबद्दल वाशिम एसपी अनुज तारे यांनी माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, 14 डिसेंबर रोजी वाशिमच्या रस्त्यावर जी कार आढळली, त्यावर 10-12 जणांनी हल्ला केला आणि ते 12-15 हजार रुपये लुटून गेले. बेवारस अवस्थेतील , तटलेली-फुटलेली कार रस्त्याकडेला असल्याचं कळल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला. मात्र त्यामध्ये 3 संदिग्ध वाहनांबद्दल माहिती मिळाली. शिवाय, अशाच प्रकारच्या तीन वाहनांमधून काही लोक आले होते आणि त्यांनी आसेगाव पेण नावाच्या गावात एका घरावर हल्ला केला होता अशी माहितीही आम्हाला मिळाली असं पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या घरातील लोकांना मारहाण करण्यात आली होती तिथे काही दिवसांपूर्वीच एक बनावट लग्न झाल्याची माहितीदेखील उघड झाली.
वधू परत कर नाहीतर वडिलांना मारू
आपण जिच्याशी लग्न केलं ती वधू बनावच आहे आणि पळून जाण्याची तयारी करत्ये ही गोष्ट वराला समजली होती. 14 डिसेंबरच्या पहाटे, तीन वाहनांमधून 10 ते 12 लोक वराच्या घरी आले. पण जेव्हा त्यांना घरात वधू सापडली नाही, (ती त्यांच्याच टोळीची सदस्य होती), तेव्हा त्यांनी वराच्या वडिलांचे अपहरण केले आणि त्यांना सोबत घेऊन गेले. वराच्या मामाच्या गावी जाऊनही त्या गँगच्या लोकांनी वधूचा शोध घेतला पण तिथेही तिचा पत्ता लागला नाहीच. अखेर त्या गँगने पीडित वर दीपक खानझोडे याला फोन केला आणि धमकी दिली. वधू (आम्हाला) परत कर आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा, वधू परत आली नाही तर तुझ्या वडिलांना मारून टाकू, अशा शब्दांत वराला धमकावण्यात आल्याचं उघड झालं.
रात्रीच्या वेळी तिन्ही वाहने तिथून निघाली तेव्हा काही अंतरावर त्यांना एक गाडी त्यांच्या मागे येत असल्याचे जाणवले. त्यांनी ती गाडी थांबवली, त्यात बसलेल्या लोकांना मारहाण केली, त्यांच्याकडून 12 ते 15 हजार रुपये हिसकावून घेतले आणि गाडीची तोडफोडही केली. पण हे सर्व संशयामुळे घडलं, कारण आरोपींनी तोडफोड केलेली गाडी नांदेडची होती आणि त्यात बसलेल्या प्रवाशांचा आरोपी आणि पीडित वराशी काहीही संबंध नव्हता. त्यांना उगाचच मार खावा लागला.
सीसीटीव्ही आणि सीडीआरच्या मदतीने, वाशिम पोलिसांनी तीन वाहनांपैकी एकाचा शोध घेतला, ज्याचे लोकेशन अहिल्या नगरमध्ये आढळले. अहिल्या नगरच्या एसपींशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. अखेर अहिल्यानगरच्या पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आणि ते त्यांना वाशिम येथे घेऊन आले. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पाच साथीदारांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना न्यायालयात हजर केले, त्यांना 19 डिसेंबरपर्यंत पीसीआरची देण्यात आली आहे.
Leave a Reply