
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवालसोबत एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘बाहुबली’ फेम प्रभासच्या ‘द राजा साब’ या चित्रपटातील ‘सहना सहना’ गाण्याच्या लाँचिंगच्या कार्यक्रमाला ती उपस्थित राहिली होती. हैदराबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता. तिथून बाहेर निघताना तिला चाहत्यांच्या मोठ्या घोळक्याने अशा पद्धतीने वेढलं, की त्यातून तिला बाहेर पडताच येत नव्हतं. तिच्यासोबत धक्काबुक्कीही झाली. या गर्दीतून ती कशीबशी तिच्या कारजवळ पोहोचली आणि त्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. निधीचा हा व्हिडीओ अस्वस्थ करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीला दिलेली अशा पद्धतीची वागणूक पाहून अनेकांनी सुरक्षेवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओ निधी चाहत्यांच्या मोठ्या गर्दीतून वाट काढत, स्वत:ला कसंबसं सावरत, स्वत:चे कपडे सांभाळत ती कारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील भिती, संकोचलेपणा, अस्वस्थपणा स्पष्ट पहायला मिळतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘चाहत्यांना त्यांची मर्यादा माहिती असावी, ती त्यांनी ओलांडू नये. हे वागणं अस्वीकार्य आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हा व्हिडीओ पाहूनच खूप अस्वस्थ वाटतंय. अत्यंत लज्जास्पद घटना आहे. इतक्या मोठ्या कार्यक्रमात अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी काहीच व्यवस्था नाही का’, असा सवाल दुसऱ्याने केला. चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी किंवा अभिनेत्रीला सुखरुप गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीच व्यवस्था का नाही, असाही सवाल अनेकांनी केला आहे.
पहा व्हिडीओ
Scary visuals of #NidhhiAgerwal being mobbed by fans at the #TheRajaSaab song launch.
A little common sense from the crowd would have made the situation better. pic.twitter.com/2kAv43zJ2Q
— Gulte (@GulteOfficial) December 17, 2025
कोण आहे निधी अग्रवाल?
निधीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. यामध्ये तिच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर निधीने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘आयस्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’, ‘हरि हारा वीरा मल्लु’ यांसारख्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. मारूती दिग्दर्शित ‘द राजा साहब’ हा तिचा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास आणि निधीसोबतच संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्याही भूमिका आहेत.
Leave a Reply