
भारतातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे पॅनकार्ड आणि आधार कार्ड आहे. ही दोन्ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमची चिंता वाढू शकते. केंद्र सरकारने म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2025 पर्यंत दोन्ही कागदपत्रे एकमेकांना लिंक केली नाहीत तर 1 जानेवारीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक करणे गरजेचे आहे.
आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मंत्रालयाने स्पष्ट केले की, ज्या लोकांनी त्यांच्या आधार नोंदणी आयडीच्या आधारे पॅन कार्ड बनवले आहे, त्यांना आता आयकर विभागाला त्यांचा आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. कर प्रणाली पारदर्शक करणे आणि बनावट पॅन रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
जर तुमचा पॅन निष्क्रिय झाले तर काय होणार?
जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल आणि तो निष्क्रिय झाले तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. पॅनकार्ड सक्रीय नसेल तर तुम्ही अनेक महत्त्वाची कामे करू शकणार नाहीत. तुम्हाला आयकर रिटर्न भरताना त्रासाचा सामना करावा लागेल. तसेच तुम्हाला अनेक बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांवरही गदा येईल. त्यामुळे तुम्ही जर पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर ते लगेच लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी दंड भरावा लागेल
तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर चिंता करू नका, ते पुन्हा सक्रीय करता येते. मात्र यासाठी तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. तुमचा पॅनकार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमचा आधार लिंक करावे लागेल, त्यासाठी 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी आधार आणि पॅनकार्ड लिंक करा आणि अतिरिक्त खर्च टाळा.
घरबसल्या पॅन आणि आधार लिंक करता येते
तुम्ही घरबसल्या तुमचा पॅन आणि आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याती आवश्यकता नाही. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन हे काम काही मिनिटांत करू शकता. ई-फायलिंग पोर्टलच्या होम पेजवर एक लिंक उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला तुमचा पॅनकार्ड आणि आधारकार्डची माहिती भरावी लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी पाठवला जाईल. तुम्ही ओटीपी सबमिट करताच तुमची लिंकिंग विनंती सबमिट केली जाते. त्यानंतर तुमची कागदपत्रे लिंक होतात.
Leave a Reply