
पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing – EOW) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंजुषा सुखदेव शिरसाट यांनी West India Classic Powerlifting Championship 2025, इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
पोलीस सेवा ही त्यांची लहानपणापासूनची स्वप्नपूर्ती असून, समाजाला न्याय मिळवून देणे, कायद्याचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणे हेच त्यांचे जीवनध्येय राहिले आहे. सध्या त्या आर्थिक फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ऑनलाइन फ्रॉड यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.
कामाच्या ताणतणावामुळे काही काळ शुगर व कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना सामोरे जावे लागल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी फिटनेसकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले. सुजितसिंग फिटनेस जिम येथे गुरु सुजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पॉवरलिफ्टिंग खेळाची सुरुवात केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्याच सहभागात पदक मिळाल्यानंतर त्यांनी या खेळात स्पर्धात्मक पातळीवर उतरायचा ठाम निर्णय घेतला.
आजवर त्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, इंदूर येथे झालेल्या वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मधील कांस्यपदक हा त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ड्युटी आणि ट्रेनिंग यांचा समतोल राखताना पहाटे व्यायाम, दिवसभर कर्तव्य आणि संध्याकाळी पुन्हा प्रशिक्षण असा अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रम त्या पाळतात. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि मानसिक स्थैर्य यावर त्या विशेष भर देतात.
या यशस्वी वाटचालीत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे आणि पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.
तसेच, आपल्या क्रीडा यशामागे भाऊ दिनेश, वहिनी साधना आणि आई यांचा वेळोवेळी मिळालेला भावनिक व मानसिक पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मंजुषा शिरसाट यांनी नमूद केले आहे.
तरुण महिला अधिकारी व गणवेशात राहून खेळात करिअर करू इच्छिणाऱ्यांना त्यांनी संदेश दिला. “गणवेश म्हणजे मर्यादा नाही—तोच शिस्त, आत्मविश्वास आणि उंच भरारीचा मजबूत पाया आहे.” एकाच वाक्यात प्रेरणा देताना त्या सांगतात, “दररोज स्वतःला मागील दिवसापेक्षा अधिक सक्षम सिद्ध करण्याची जिद्द—हीच माझी खरी ताकद आहे.” असं त्या म्हणाल्या.
Leave a Reply