
Pakistan Vs Afghanistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत. पहलगामवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला सळो की पळो करून टाकले. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक पातळीवर कोंडी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. याच निर्णयाअंतर्गत भारताने पाकिस्तानसोबतच सिंधू नदी जलवाटप करार भारताने स्थगित करून टाकला. अजूनही हा करार पूर्ववत चालू नाही. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानपुढे पाणी टंचाईच्या रुपात मोठे संकट उभे ठाकले आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवलेला आहे. असे असतानाच आता अफगाणिस्तान देशदेखील पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानने हा निर्णय घेतला तर पाकिस्तानमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते.
पाकिस्तानचे पाणी थांबवले जाणार?
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. हा वाद मागे पडत असतानाच आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान सरकार कुनार नदीचा प्रवाह नांगरहार या भागाकडे वळवण्याचा विचार करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होईल.
बैठकीत प्रस्ताव मंजूर
सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये बैठका होत आहेत. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अफगाणिस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तेथील पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आर्थिक आयोगाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या प्रस्तावात कुनार नदीचा प्रवाह नांगरहारच्या दारुंता डॅममध्ये वळवला जाणार आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू झाली की नांगरहार भागात असलेल्या शेतीला पाणी मिळेल. तेथील सिंचनाची समस्या दूर होईल. पण यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल.
पाकिस्तानवर काय परिणाम पडणार?
कुनार नदीची एकूण लांबी 500 किमी आहे. ही नदी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील चित्रल जिल्ह्यातील हिंदुकुश डोंगरातून निघते. पुढे ती दक्षिण अफगानिस्तानातील कुनार आणि नांगरहार प्रांतात जाते. पुढे ही नदी काबुल नदीला मिळते. या दोन्ही नद्यांना पुढे पेच नदीदेखील मिळते आणि पूर्वेला जात पाकिस्तानात पोहोचते. पाकिस्तानातील पंजाब प्रातात नंतर अटक शहरातील सिंधु नदीला मिळते. अफगाणिस्तानने या नदीचा प्रवाह बदलला तर पाकिस्तानला सिंचनाची अडचण येऊ शकते.
Leave a Reply