
'तेरी मिट्टी' फेम गायक बी प्राक पुन्हा एकदा बाबा झाला आहे. तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये प्राकने त्याच्या एका बाळाला गमावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण परतला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलाचं नाव जाहीर केलं.
'राधेश्यामच्या कृपेने 1 डिसेंबर 2025 रोजी आम्हाला मुलगा झाला. आमचं हृदय कृतज्ञतेच्या आणि आनंदाच्या भावनेनं भरलंय. सूर्य पुन्हा एकदा उगवला आहे आणि या सूर्याने आमच्या आयुष्यात प्रकाश, आशा आणि नवीन सुरुवात घेऊन आला आहे', अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.
बी प्राकने त्याच्या मुलाचं नाव द्विज बच्चन असं ठेवलं आहे. 'द्विज बच्चन- पुनर्जन्म, एक अध्यात्मिक पुनर्जन्म', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बी प्राकचं खरं नाव प्रतीक बच्चन असं आहे.
4 एप्रिल 2019 मध्ये बी प्राक आणि मीराने लग्नगाठ बांधली. तर 2020 मध्ये मीराने पहिल्या मुलाला जन्म दिला. बी प्राकने अनेक हिंदी आणि पंजाबी गाणी गायली आहेत. बॉलिवूडमधील 'तेरी मिट्टी' हे त्याचं गाणं विशेष गाजलं.
2022 मध्ये बी प्राकच्या दुसऱ्या मुलाचं जन्मानंतर लगेच निधन झालं. त्याच्या पत्नीला बाळाला बघताही आलं नव्हतं. कारण त्याने त्याआधीच बाळावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे पत्नी अजूनही नाराज असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.





Leave a Reply