
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेता अक्षय खन्ना सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एकीकडे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे, तर दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्यसुद्धा प्रकाशझोतात झालं आहे. खरंतर अक्षय खन्नाला प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. म्हणूनच तो कुठल्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. परंतु त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या स्टारडमला चाहत्यांनीही खूप एंजॉय केलं. करिअरच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी सर्व गोष्टींचा त्याग करत अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता. पत्नी गीतांजली आणि दोन्ही मुलांना सोडून ते ओशोंच्या आश्रमात गेले होते. विनोद खन्ना आणि गीतांजली यांचा घटस्फोट का झाला, त्याविषयी जाणून घेऊयात..
अक्षय खन्नाची आई
विनोद खन्नाची पहिली पत्नी गीतांजली तलेयारखान या एका प्रसिद्ध पारसी कुटुंबातून होत्या. त्या मॉडेल होत्या. गीतांजली यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य वकील आणि बिझनेसमन होते. परंतु ग्लॅमरचं विश्व निवडणाऱ्या त्या कुटुंबातील पहिल्या सदस्य ठरल्या होत्या. ए. एफ. एस. तलेयारखान यांच्या त्या कन्या होत्या. ए. एफ. एस. तलेयारखान हे 1950 च्या दशकात भारताच्या सुरुवातीच्या कमेंटेटर्सपैकी एक होते.
विनोद खन्ना आणि गीतांजली यांची पहिली भेट
विनोद खन्ना आणि गीतांजली यांची पहिली भेट कॉलेजच्या दिवसांमध्येच झाली होती. गीतांजली यांना पाहताचक्षणी विनोद खन्ना त्यांच्या प्रेमात पडले होते. फिल्म इंडस्ट्रीतील करिअर सुरु करण्यापूर्वी विनोद आणि गीतांजली डेट करू लागले होते. अभिनेते आणि निर्माते सुनील दत्त यांनी विनोद खन्ना यांना चित्रपटसृष्टीतील पहिली ऑफर दिल्याचं म्हटलं जातं. ‘मन का मीत’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली होती.
1971 मध्ये विनोद खन्ना-गीतांजली यांचं लग्न
फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रियता वाढल्यानंतर विनोद खन्ना यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 1971 मध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत विनोद खन्ना यांनी गीतांजली यांच्याशी लग्न केलं. लग्नाच्या वर्षभरानंतर गीतांजली यांनी राहुलला जन्म दिला. त्यानंतर 1975 मध्ये अक्षय खन्नाचा जन्म झाला. विनोद खन्ना त्यांच्या कुटुंबाला फार महत्त्व द्यायचे. इतकंच नव्हे तर त्यासाठी त्यांनी रविवारी काम न करण्याचाही नियम बनवला होता.
विनोद खन्ना यांनी 1982 मध्ये घेतला संन्यास
प्रसिद्धी, यश आणि आनंदी आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर विनोद खन्ना अध्यात्माकडे वळले. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी 1982 मध्ये संन्यास घेतला. सर्वकाही सोडून ते ओशोंच्या आश्रमात राहायला गेले. या निर्णयाचा त्यांच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला होता.
विनोद खन्ना-गीतांजली यांचा घटस्फोट का झाला?
सुरुवातीला अमेरिकेत राहत असताना विनोद यांनी फोनद्वारे गीतांजली आणि त्यांच्या मुलांशी संपर्क साधला. परंतु जेव्हा दोन्ही मुलं मोठी होत होती, तेव्हा गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होत गेल्या. मुलांचं एकटीने संगोपन करणं गीतांजली यांना कठीण जात होतं. तीन वर्षांपर्यंत एकटीने सर्वकाही सांभाळल्यानंतर अखेर गीतांजली यांनी विनोद खन्ना यांना अल्टीमेटम दिला. कुटुंब किंवा अध्यात्म या दोघांपैकी एक गोष्ट निवडण्याचा हा अल्टीमेटम होता. परंतु त्यालाही विनोद खन्ना यांनी प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 1985 मध्ये विनोद खन्ना आणि गीतांजली कायदेशीररित्या विभक्त झाले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय त्याच्या वडिलांच्या संन्यासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘मिड डे’शी बोलताना तो म्हणाला, “संन्यास म्हणजे तुमच्या जीवनाचा पूर्णपणे त्याग करणं. कुटुंब हा त्याचाच एक भाग आहे. हा एक आयुष्य बदलणारा निर्णय होता, जो त्यांना त्यावेळी आवश्यक वाटला. मी तेव्हा पाच वर्षांचा होतो आणि मला ते सर्व त्यावेळी समजणं अशक्य होतं. पण आता मी ते समजू शकतो.”
भारतात परतल्यानंतर ओशोंच्या सल्ल्यानुसार विनोद खन्ना यांनी पुन्हा अभिनयातील कारकीर्द सुरू केली. वयाच्या 43 व्या वर्षी त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी कविता दफ्तरीशी दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विनोद खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर गीतांजली यांनी पुन्हा लग्न केलं नाही. 2017 मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी 2018 मध्ये गीतांजली यांचंही वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं.
Leave a Reply