
संजय राऊत यांनी महाराष्ट्रात वाढत्या भ्रष्टाचार आणि ड्रग्ज रॅकेटवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार सहन करणार नसल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात भ्रष्टाचाराला उत्तेजन देत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात सापडली असून, आता राज्यातच ड्रग्जचे कारखाने उघडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात आल्याचा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. तुषार जोशी यांनी ड्रग्ज रॅकेटमधून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.
धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाभोवतीच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याच्या मार्गावर असताना, धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याचे समोर आले. मात्र, धनंजय मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे त्यांना परत मंत्रिमंडळात घेणे फडणवीसांसाठी सोपे नाही, असे राऊत म्हणाले. भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देऊन सरकार चुकीचा संदेश देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Leave a Reply