
‘दृश्यम 1’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता ‘दृश्यम’च्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकतीच झाली. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली. परंतु त्याआधीच या चित्रपटातून अक्षय खन्नाच्या एक्झिटच्या बातम्यांमुळे चाहत्यांना धक्काही बसला. अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’साठी अधिक मानधन मागितल्यामुळे ऐनवेळी या चित्रपटातून त्याची एक्झिट झाल्याची चर्चा होती. आता त्याच्या जागी ‘दृश्यम 3’मध्ये ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावत याची वर्णी लागली आहे. निर्माते कुमार मंगत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अजय देवगन, श्रिया सरन, तब्बू आणि इशिता दत्ता यांच्या भूमिका असलेल्या ‘दृश्यम 3’ची कथा आधीपेक्षा अधिक रंजक असल्याचं टीझरमध्ये सांगितलं गेलं. परंतु ठीक त्याच्या दुसऱ्याच दिवशी अशी चर्चा समोर आली की मानधनाच्या कारणास्तव अक्षय खन्नाने यातून माघार घेतली आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अक्षय खन्नाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटशी बोलताना निर्माते कुमार मंगत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे की जयदीप अहहलावतने ‘दृश्यम 3’मध्ये अक्षय खन्नाची जागा घेतली आहे.
“दृश्यम हा एक खूप मोठा ब्रँड आहे. या चित्रपटात अक्षय आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही. आता जयदीप अहलावतने त्याला रिप्लेस केलं आहे. देवाच्या कृपेने आम्हाला अक्षयपेक्षा अधिक चांगला अभिनेता भेटला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षयपेक्षा उत्तम व्यक्ती आम्हाला भेटली आहे,” असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. एका अर्थी या प्रतिक्रियेतून त्यांनी अक्षय खन्नाला टोमणाच मारला आहे.
शूटिंग सुरू होण्याच्या फक्त दहा दिवस आधी अक्षयने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याने निर्माते, दिग्दर्शक त्याच्यावर प्रचंड नाराज झाल्याचा पाहायला मिळतंय. याविषयी निर्माते कुमार मंगत पुढे म्हणाले, “मी जयदीपच्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक ‘आक्रोश’ची निर्मिती केली होती. मला अक्षय खन्नाच्या वागणुकीच्या कारणास्तव नुकसान झेलाव लागलं. मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. यासाठी मी त्याला कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे. या नोटिशीला त्याने अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार जयदीप अहलावत जानेवारी 2026 पासून ‘दृश्यम 3’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. जयदीपच्या भूमिकेमुळे ‘दृश्यम 3’च्या कथेत अत्यंत रंजक वळण येणार असल्याचं कळतंय.
Leave a Reply