
प्रत्येक घरात भाजी-चपाती असो वा नसो पण डाळभात तर असतोच असतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात डाळभाताशिवाय जेवण हे अपूर्णच असतं. इतका तो आवडीने खाल्ला जातो. पण प्रत्येकाच्या घरात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असते. डाळ अनेक पद्धतीने बनवली जाते. काहींच्या घरात की काहीशी गोडपद्धतीने बनवली जाते तर काहींच्या घरात ती मिरची-कडीपत्ताची फोडणी देऊन तडकावाली डाळ खाल्ली जाते.
डाळ कोणतीही शिजवली तरी देखील त्यात एक पदार्थ वापरलाच जातो.
डाळीचेही अनेक प्रकार असतात. जसे की तुर, मूग, कवचयुक्त मूग, उडीद आणि चना. पण डाळ कोणतीही शिजवली तरी देखील त्यात एक पदार्थ वापरलाच जातो. त्याच्याशिवाय डाळीची चव वाढत नाही. हा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हिंग. हिंग हा एक नैसर्गिक मसाला आहे जो फेरुला नावाच्या वनस्पतीच्या मुळापासून निघणाऱ्या द्रवापासून बनवला जातो. हिंग हा डाळ आणि भाज्यांची चव वाढवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डाळीमध्ये हिंग घालणे आवश्यकच का असते? तर त्यामागील एक कारण म्हणजे डाळीची चव वाढते आणि दुसरं कारण म्हणजे त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे.
हिंग कसा तयार होतो?
हिंग हा वनस्पती प्रामुख्याने इराण, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सारख्या शुष्क प्रदेशात आढळतो आणि तो प्रामुख्याने शेती उत्पादन म्हणून भारतात आयात केला जातो. हिंगाच्या मुळापासून पहिल्यांदा कापणी केली जाते तेव्हा कापलेल्या भागातून दुधाळ रस (राळ) बाहेर पडतो. हा द्रव हळूहळू जाड होतो आणि घट्ट होतो, ज्यामुळे कच्चा हिंग तयार होतो. काही आठवड्यांनंतर, हे राळ सुकून खडबडीत, तपकिरी किंवा लालसर-पिवळ्या रंगात बदलते, जे खरे हिंग म्हटले जाते.
डाळीमध्ये हिंग घालण्याचे वैज्ञानिक कारण
डाळींमध्ये प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन असते. सेल्युलोज हे एक जटिल कार्बोहायड्रेट आहे जे मानवी पचनसंस्थेमध्ये सेल्युलेज या एन्झाइमच्या कमतरतेमुळे थेट खंडित होऊ शकत नाही. यामुळे, काही डाळी पचल्याशिवाय आतड्यांमध्ये पोहोचतात, जिथे ते गॅस निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाद्वारे आंबवले जातात. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.
पोटाला आराम मिळतो
पण जेव्हा तुम्ही डाळीमध्ये हिंग घालता तेव्हा हिंगमधील वाष्पशील सल्फर संयुगे आतड्यांतील सूक्ष्मजीव प्रक्रिया संतुलित करतात, ज्यामुळे वायू तयार होण्यास प्रतिबंध होतो. हिंगमधील अँटीस्पास्मोडिक संयुगे आतड्यांतील स्नायूंना आराम देतात, ज्यामुळे पोटफुगी होणे किंवा गॅस होणे टाळले जाते. त्यामुळे एखादी डाळ किंवा भाजी तुम्हाला पचायला थोडी जड वाटत असेल तर त्यात फोडणीला नक्कीच चिमूटभर हिंग टाका.त्यामुळे भाजीची चव तर वाढतेच पण सोबतच पोटाला त्रास होत नाही.
Leave a Reply