
नागपुरातील पारडी शिवारातील दाट लोकवस्तीत शिरलेल्या बिबट्याने आज पहाटे धुमाकूळ घालत चार जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात आले आहेत.
नागपुरातील पारडी शिवारात दोन तास हे बिबट्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु होते. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. त्यानंतर त्या सुरक्षित पकडण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी कापसी भागात बिबट्या दिसल्याची माहिती होती, पण तेव्हा शोध घेऊनही तो सापडला नव्हता. दरम्यान, आज पहाटे पारडी शिवारातील शिवनगर परिसरात याच बिबट्याने दहशत निर्माण केली.
सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास बिबट्याने चार जणांना जखमी केले आणि त्यानंतर तो वर्मा कुटुंबीयांच्या घरात लपून बसला होता. बिबट्या दाट लोकवस्तीत शिरल्यामुळे वन विभाग आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बिबट्या लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवण्यात आला होता. या ठिकाणी सुरुवातीला बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. तसेच सातत्याने होणाऱ्या आवाजामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.
वन विभागाचे रेस्क्यू पथक आणि वैद्यकीय तज्ञ आवश्यक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. बिबट्या घरातून निसटणार नाही यासाठी घराच्या मुख्य दाराला जाळी बांधण्यात आली.






Leave a Reply