
मध्य प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अजाक्सचे नवीन प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अनेक सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. संतोष वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर संतोष वर्मा यांनी खेद व्यक्त केला आहे. अजाक्सच्या (अनुसूचित जाती जनजाती कर्मचारी संघ) एका कार्यक्रमात संतोष वर्मा यांनी आरक्षण आणि सामाजिक रचनेवर टिप्पणी केली. “माझा मुलगा जो पर्यंत कुठल्या ब्राह्मण मुलीशी लग्न करत नाही किंवा ब्राह्मण समाज आपली मुलगी माझ्या मुलासाठी दानमध्ये देत नाही, तो पर्यंत हे आरक्षण सुरु राहिलं पाहिजे” असं संतोष वर्मा म्हणाले.
संतोष वर्मा यांनी असं वक्तव्य करुन सामाजिक वीण आहे, त्यावर आघात केलाय असं सवर्ण संघटनांनी म्हटलय. मंत्रालय सेवा अधिकारी/कर्मचारी संघाने हे अपमानास्पद आणि अस्वीकार्य असल्याचं म्हटलं. ब्राह्मण समाजाच्या अनेक संघटनांनी या वक्तव्याबद्दल FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. संतोष वर्मा यांनी जुनी प्रकरणं सुद्धा पुन्हा चर्चेत आली आहेत.
ते चर्चेचा विषय बनण्याची ही पहिली वेळ नाही
संतोष वर्मा मध्य प्रदेश राज्य सेवा अधिकारी होते. पदोन्नतीच्या माध्यमातून ते IAS केडरमध्ये पोहोचले. अजाक्स प्रदेशाध्यक्ष म्हणून अलीकडेच झालेल्या नियुक्तीने ते पुन्हा चर्चेत आले. ते सार्वजनिक चर्चेचा विषय बनण्याची ही पहिली वेळ नाही. संतोष वर्मा यांच्या करिअरमध्ये त्यांच्या नावाशी संबंधित अनेक घटनांची वेळोवेळी मीडियामध्ये चर्चा होत राहिली आहे.
त्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित काही प्रकरणं चर्चेत
संतोष वर्मा यांच्याविरोधात एका महिलेच्या तक्रारीवरुन इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाण्यात मारहाणीच्या आरोपाचा गुन्हा दाखल झालेला. याच प्रकरणात आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जजची स्वाक्षरी असलेल्या एका कागदपत्राचा वापर केलेला. चौकशीत ते कागदपत्र अवैध आढळून आलं. तपास यंत्रणांनी चौकशीत कागदपत्रात अनियमितता असल्याची पृष्टी केली. त्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागलेला. माहितीनुसार, त्यांना जवळपास तीन महिने न्यायालयीन कोठडीत काढावे लागलेले. संतोष वर्मा ज्या ज्या जिल्ह्यात तैनात होते, तिथे त्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित काही प्रकरणं चर्चेत आली.
Leave a Reply