
प्रत्येक कुटुंबात वाद, संघर्ष आणि भांडण होतच असते. या वादाला योग्य पद्धतीने न हाताळल्यास त्याचे परिणाम वाईट होतात. विशेष म्हणजे एखाद्या कुटुंबात सून आलेली असेल तर हे वाद वेगळ्याच पद्धतीचे असतात. कधीकधी हे भांडण एवढे वाढते की थेट कुटुंब विभक्त होतात. त्यामुळेच घरात सासू-सूनेचे भांडण हे कुटुंब विभक्त होण्यास प्रमुख कारण असतात, असे सर्रास लोक म्हणतात.
कुटुंबात सासू आणि सूनेचे नाते फार महत्त्वाचे असते. या नात्यात जर मिठाचा खडा पडला तर त्याची झळ कुटुंबातील इतरांनाही होते. त्यामुळेच हे नाते सासू आणि सूनेने हाताळणे फार गरजेचे आहे. खरं म्हणजे हे नाते टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही सासूसोबतच सूनेवरही तेवढीच असते.
अनेकदा कुटुंब क विभक्त होते? त्यामागे सासूचा हात असतो की सूनेचा असे नेहमी विचारले जाते. कुटुंबाचा खेळखंडोबा होण्याला फक्त सासू किंवा सूनेला जबाबदार धरणे अयोग्य आहे. आई आणि मुलाचे नाते फार वेगळे असते. या नात्यात भावनिक ओलावा असतो. आईला आपल्या मुलाची नेहमीच काळजी असते.
त्यामुळे आपल्या मुलाला त्रास झाला की आईलाही त्रास होतोच. परिणामी आपल्या वागण्याने नवऱ्याला त्रास होऊ नये याची संबंधित सूनेने काळजी घेणे गरजेचे आहे. नवरा खूश असेल तर सासूदेखील खूश राहते. तसेच आपण सासू असलो म्हणजे घरातील सूनेचे मालक झालो, असे नसते. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व असते. म्हणूनच संबंधित व्यक्तीचा आदर राखणे गरजेचे असते.
सासूने सूनेला प्रत्येक वेळी टोचून बोलणे, शिकवण्याचा प्रयत्न करणे टाळावे. सूनेला आपल्या मनासारखे काम करण्यास मुभा द्यावी. तसेच सूनेची सासू न होता मैत्रीण, आई कसे होता येईल याचा प्रयत्न करावा. असे केल्यास सासू-सूनेतील नाते टिकून राहते आणि कुटुंब विभक्त होत नाही.




Leave a Reply