
भारती चलनी नाण्यांबाबत नेहमीच वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. कधी एक रुपया बंद झाला आहे, अस सांगितले जाते. तर कधी 10 रुपयांचे नाणेच सरकारने बंद केले आहे, असा दावा केला जातो. याबाबतच आता भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी माहिती दिली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 50 पैसे,एक रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये यासारख्या नाण्यांविषयी असलेल्या वेगवेगळ्या चर्चांविषयी स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच कोणते नाणे अजूनही व्यवहारात चालू आहे, याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे.
अनेकदा 50 पैशांचा सिक्का तसेच एक रुपया चलनातून बाद झाला आहे, असे सांगितले जात आहे. आता आरबीआयने सांगितल्यानुसार तुमच्याकडे 50 पैसे असतील तर त्याच्या मदतीने तुम्हाला अजूनही व्यवहार करता येईल.
सोबतच एक रुपयादेखील चलनात चालूच आहे. तोही बंद झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना गोंधळून जाऊ नये, असे आरबीआयने सांगितले आहे. कधी-कधी 10 रुपयांचे नाणेदेखील बंद झाले आहे, अशा वावड्या उठवल्या जातात. यावरही लक्ष देऊ नये असे आरबीआयने सांगितले आहे.
आरबीआयने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केलेले आहे. व्यापाऱ्यांनी 50 पैसे, एक रुपया तसेच इतरही नाण्यांचा स्वीकार करावा, असे म्हटले आहे. भविष्यातही एखादी शंका आल्यास आरबीआयने दिलेली माहितीच खरी समजावी, असेही सांगण्यात आले आहे.




Leave a Reply