
नृत्याची आवड असलेल्या एका निष्पाप तरुणीला कलेचे आमिष दाखवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती येथील तरुणीला अंबाजोगाईत आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका मुख्य संशयित महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलेच्या नावाखाली फसवणूक
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आमच्या पायल कलाकेंद्रामध्ये नृत्यासाठी मुलींची गरज आहे. तुमच्या मुलीला तिथे नृत्याचे प्रशिक्षण मिळेल आणि चांगला पगारही मिळेल, असे खोटे आमिष तिने आईला दाखवले. घरची परिस्थिती आणि मुलीची आवड लक्षात घेता आईने तिला अंबाजोगाईला पाठवण्याचा निर्णय घेतला.
मारहाण आणि बलात्कार
पीडित मुलगी अंबाजोगाईत पोहोचल्यानंतर तिला पायल कलाकेंद्र येथे नेण्यात आले. मात्र, तिथले वातावरण पाहून तरुणीने तिथे राहण्यास आणि काम करण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून बदामबाई आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी पीडितेला दया न माया दाखवता तिला बेदम मारहाण केली. तिला जबरदस्तीने शहरातील साई लॉज येथे नेण्यात आले. तिथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या हवाली केले. यानंतर ती स्वतः तिथून निघून गेली. या लॉजवर मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
या अत्याचारानंतर नराधमांनी पीडितेला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे आणून सोडले. तिथे तिला डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावण्यात आले. मात्र, पीडितेने हिंमत न हारता गुप्तपणे आपल्या आईशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार रडत सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आईने तात्काळ अंबाजोगाई गाठले. त्यानंतर स्थानिक मदतीने मुलीची तिथून सुटका करून तिला बारामतीला सुरक्षित आणले.
परिसरात मोठी खळबळ
यानंतर पीडितेच्या आईने सुरुवातीला बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई असल्याने हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) बलात्कारासह, मारहाण आणि धमकावण्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणातील पायल कलाकेंद्र आणि साई लॉजच्या मालकांचीही चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पोलीस आरोपींच्या मागावर असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Leave a Reply