
दिनांक 15 डिसेंबर 2025… स्थळ बिहारचा मुजफ्फरपूर जिल्हा… या जिल्ह्यातील एका घरात जे काही घडलं त्याने संपूर्ण जिल्हाच नाही, राज्यच नाही तर अख्खा देश हादरून गेलाय. एका व्यक्तीने बायकोच्या साडीचे सहा फास बनवले. अन् तीन मुली दोन मुलांसह स्वत:ही जीव दिला. सर्वांना फासावर लटकवल्यावर आता आपण याला लटकूया असं म्हणत त्याने जीवन संपवलंय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच आजूबाजूचे नागरिक प्रचंड घाबरून गेले आहेत.
तीन मुली आणि दोन मुली फासाला लटकण्यासाठी ट्रंकवर चढल्या. वडिलांनी सांगितलं तसंच केलं. पण एका मुलाचा श्वास कोंडू लागल्याने त्याने आटापिटा करत स्वत:चा कसातरी जीव वाचवला. त्याने लगेच आपल्या भावाच्या गळ्याचाही फास काढला. त्यामुळे दोघे भाऊ वाचले. पण वडील आणि तीन बहिणींचा मृत्यू झाला. त्यानंतर या दोन्ही मुलांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. त्यामुळे शेजारीपाजारी तात्काळ धावून आले. घरात चार मृतदेह लटकलेले पाहून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. आता पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत.
पोलीसही हादरले
पोलिसांनी सर्वच्या सर्व चार मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी या दोन्ही मुलांना विश्वासात घेतलं. त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. ही माहिती ऐकून पोलीसही हादरून गेले आहे. कुणाच्याही काळजाची धडधड होईल, असाच हा प्रकार घडला. जर ही दोन मुले वाचली नसती तर नेमकं काय झालं? हे कधीच कळलं नसतं.
बायको गेली सर्व गेलं…
सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलपूर मिश्रौलिया गावात ही घटना घडली आहे. अमरनाथ राम हा या गावात कुटुंबासह राहत होता. त्याची आर्थिक स्थिती प्रचंड हालाखीची होती. अमरनाथच्या बायकोचा याच वर्षी जानेवारीत मृत्यू झाला. त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला होता. या धक्क्यातून तो सावरला नव्हता. बायको गेल्याचा एवढा धक्का बसला की त्याने कामधंदा करायचंच सोडून दिलं. त्याला पाच मुले आहेत. तीन मुली राधा कुमारी (11), राधिका (9) आणि शिवानी(7). तसेच दोन मुलंही आहेत. शिवम आणि चंदन.
अंडा भुर्जी खाल्ली अन्…
शिवमने घरातील सर्व परिस्थिती पोलिसांना सांगितलीय. आई गेल्यानंतर पप्पा डिप्रेशनमध्ये गेले होते. सरकारी रेशनवर आमचं घर चालायचं. पैशाची खूपच तंगी होती. आई गेल्याचं दु:खं आणि आर्थिक अडचण यामुळे वडील खूपच दु:खी झाले होते. 14 डिसेंबरच्या रात्री पप्पाने आम्हाला अंडा भुर्जी आणि आलू सोयबीनची भाजी, तसेच भात खायला दिला. जेवण केल्यावर आम्ही सर्व झोपलो. मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी मोबाईलवर खेळत होतो. सोमवारी सकाळी वडिलांनी सर्वांना उठवलं. घरात आईच्या साडीचे सहा फास बनवल्याचं आम्ही उठल्यावर पाहिलं. फासाखाली ट्रंक ठेवली होती, असं शुभम म्हणाला.
वडीलच म्हणाले की…
आमच्या गळ्याला फास लावला. आणि वडिलांनी आम्हाला उडी मारायला सांगितली. आम्ही वडिलांचं ऐकलं. पण माझा श्वास कोंडला गेला. मी कसं तरी करून फास गळ्यातून काढला आणि चंदनच्या गळ्यातूनही फास काढला. त्यामुळे आम्ही दोघं वाचलो. आमच्या वडिलांना आणि बहिणींना वाचवण्यासाठी आम्ही जोरजोरात ओरडलो. शेजारी आले. पण तोपर्यंत या सर्वांचा मृत्यू झाला होता. वडिलांना आईची खूप आठवण यायची. तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. त्यांनी सकाळीच आम्हाला उठवून आता आपल्याला मरावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी जसं सांगितलं. तसंच आम्ही केलं, असं शिवम म्हणाला.
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी आलो. मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनाला पाठवले आहेत. मृत्यूचं कारण असून अस्पष्ट आहे. आम्ही गावातील लोकांची तपासणी करत आहोत. दोन्ही मुलांकडूनही माहिती घेतली जात आहे. आर्थिक तंगी आणि बायकोच्या निधनाचा धक्का बसल्यानेच या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी समजतंय. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई करू, असं पोलिसांनी सांगितलं.
Leave a Reply