
12 डिसेंबर 2025 रोजी एक अशी वेब सीरिज रिलीज झाली आहे जी पाहून अंगावर काटा येईल. ही सीरिज प्रेक्षकांना वेगळ्याच जगाचा विचार करायाला भाग पाडते. ती सीरिज म्हणजे ‘भय’. ही एक सत्य घटनेवर आधारित वेब सीरिज असल्याचं म्हटलं जातं. “भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” असं या वेब सीरिजचे नाव असून गौरव जो की एक प्रसिद्ध इंटरनॅशनल पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता. त्याच्या रहस्यमयी आयुष्यावर ही सीरिज बनवण्यात आली आहे.’भय’मध्ये “स्पेशल ऑप्स” या सुपरहिट वेब सिरीजमध्ये रॉ एजंट फारुक अलीची शक्तिशाली भूमिका साकारणारा अभिनेता करण टॅकरने गौरवची भूमिका साकारली आहे.
देशातील पहिला पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर
दरम्यान ज्यांनी ही सीरिज पाहिली आहे. ते सर्वजण या सीरिजचे कौतुक करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे एड आणि लॉरेन नावाचे आंतरराष्ट्रीय पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होते, तसेच आपल्या देशातही एक अलौकिक पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता. तो म्हणजेच गौरव तिवारी. तो देशातील पहिला पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता आणि त्याने आत्म्यांच्या शोधासाठी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली. नंतर त्याचा इतका दुःखद आणि रहस्यमय मृत्यू झाला की सर्वांनाच धक्का बसला. नऊ वर्षांनंतरही, गौरवच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही.
भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ मधील कलाकार
“भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” चा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला. अवघ्या 24 तासांत हा ट्रेलर 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला. या वेब सीरिजमध्ये करण टॅकर, कल्की कोचलिन, दानिश सूद, निमेश नायर, सलोनी बत्रा, घनश्याम गर्ग आणि इतर अनेक कलाकार आहेत. ही मालिका बॉबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शित केली आहे.
‘भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ कुठे पाहू शकता?
“भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” हा चित्रपट गौरव तिवारीच्या केस, त्याच्या संशयास्पद मृत्यू आणि त्याच्या अनुभवांवर आधारित आहे. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ही सीरिज 12 डिसेंबर रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
गौरव तिवारीने लोकांना एका वेगळ्या जगाशी ओळख करून दिली
गौरव तिवारी हा एक पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता. पण या क्षेत्रात येण्याआधी त्याला पायलट व्हायचे होते आणि तो त्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिथे त्याने एविएशन सेक्टर क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्याचा हा नवीन प्रवास सुरु झाला. त्यानंतर तो भारतात परतला आणि त्याने पॅरानॉर्मल सोसायटी स्थापन केली. त्यानंतर त्याने पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गौरवने भूतांचे जग, त्यांच्या श्रद्धा मांडल्या आणि अनेक विश्वास ठेवण्यास कठीण प्रश्नांची उत्तरे शोधून दिली. उदाहरणार्थ, मृत्यूनंतर काय होते? आत्मा कुठे जातो? भूत खरोखर अस्तित्वात असतात का? गौरव तिवारीने अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्या कामातून लोकांना दाखवून दिली.
असेही म्हटले जायचे आणि सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे तो खरोखरंच दुसऱ्या जगाशी कनेक्ट होऊ शकत होता. तो आत्म्यांशी बोलायचा, त्यांना मुक्ती न मिळण्यामागील कारणे जाणून घ्यायचा. तो त्या एनर्जीशी एकरूप व्हायचा. याचा अनेकांनी अनुभव घेतल्याचंही सांगितलं आहे.
9 वर्षांनंतरही गौरवच्या मृत्यूचे गूढ उलगडले नाही
अचानक एक दिवस गौरव तिवारीच्या मृत्यूची बातमी आली. 7 जुलै 2016 रोजी त्याचा रहस्यमयी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह तो राहत असलेल्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये आढळला. तो दिल्लीतील द्वारका येथील सेक्टर 19 मध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता. गौरवच्या बाथरूममध्ये एक दुपट्टाही सापडल्याचे वृत्त आहे. गौरवने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय होता. मात्र काहींनी असा दावा केला की गौरवचा मृत्यू एक एक्सपेरिमेंट करताना झाला. त्यावेळी एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी गौरव तिवारीने त्याच्या पत्नीला सांगितले होते की एक वाईट शक्ती त्याला त्याकडे खेचत आहे. तो त्या शक्तीवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता आणि स्वतःला रोखूही शकत नव्हता. त्यामुळे गौरव तिवारीचा मृत्यू नक्की कसा झाला याचं ठोस उत्तर आतापर्यंत कोणीच देऊ शकलेलं नाही.
Leave a Reply