
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. पुण्यासह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सर्वच पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. विविध पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेत आहेत. अशातच आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विश्वासू शिलेदाराने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राजकारणातून संन्यास घेतला आहे. जरा विसावू या वळणावर या शीर्षकाखाली माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी एक पोस्ट लिहीत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास
ऐन महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय असलेल्या विशाल तांबे यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. विशाल तांबे हे सलग तीन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2007,2012 आणि 2017 साली त्यांनी धनकवडी परिसरातून विजय मिळवला होता. विशाल तांबे यांनी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे.
यानंतर बोलताना विशाल तांबे यांनी म्हटले की, मी महानगरपालिका निवडणुकांपासून दूर राहणार आहे. मी कुठेही पक्षावर नाराज नाही. 19 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी काम बघितले आहे, मात्र आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोर ही माझी भूमिका मांडली आहे असंही तांबे यांनी म्हटले आहे.
विशाल तांबे यांची पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये विशाल तांबे यांनी म्हटले की, धनकवडी या माझ्या विस्तारित कुटुंबातील बंधू – भगिनींना सप्रेम नमस्कार… खरं तर मला खूप दिवसांपासून आपल्याशी मनापासून बोलायचं होतं. पण असं म्हणतात, काही गोष्टींचा काळ यावा लागतो. वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ आली आहे. म्हणून आपल्याशी हा आपुलकीचा संवाद साधतं आहे.
तसं तर धनकवडी हे माझं कुटुंब. प्रत्येक धनकवडीकर नागरिक, माता-भगिनी माझ्या कुटुंबातील आणि मी तुमच्या कुटुंबातील सदस्य. हे आपलं नातं हळूहळू बहरत गेलं. आपुलकी आणि विश्वासानं ते अधिक घट्ट बनलं. अशा या जीवाभावाच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं भाग्य फार कमी लोकांना मिळतं. खरं तर तुमचे माझ्यावर खूप ऋण आहेत. या ऋणातून मला उतराई व्हायचं नाही, तर ते ऋणानुबंध मनात साठवायचं आहे. तुमच्या आठवणी जपायच्या आहेत.
आज मी जेव्हा आपली धनकवडी असं म्हणतो, तेव्हा मन आपोआप ३० वर्षे भूतकाळात जातं. मी या परिसराच्या प्रेमात व सहवासात वाढलो, घडलो. या परिसराशी नाळ जुळली गेली. त्यातूनच आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून काम करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. विद्यार्थी-दशेपासूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार व जनसेवेची उर्मी उत्तरोत्तर वाढत गेली असं तांबे यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply