
फाळणीनंतर पहिल्यांदाच, पाकिस्तानच्या एका विद्यापीठाने औपचारिकपणे प्राचीन भाषा संस्कृत शिकवण्यास सुरुवात केली आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) ने हा उपक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात संस्कृतसह महाभारत आणि भगवद्गीता यासारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास विद्यार्थांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असेल. या पाऊलाकडे शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे.
हा नवीन अभ्यासक्रम अचानक अस्तित्वात आला नाही. तर एका वीकेंड वर्कशॉपमध्ये या विषयांचा पाया रचला गेला, ज्यामध्ये विद्यार्थी, संशोधक आणि भाषेत रस असलेल्यांनी भाग घेतला. संस्कृतमध्ये असलेली आवड याचा उत्साह आणि सहभागामुळे तेथील विद्यापीठ प्रशासनाला हा विषय नियमित अभ्यासक्रम म्हणून विचारात घेण्यास प्रवृत्त केले. यामुळे औपचारिकपणे संस्कृत शिकवण्याचा निर्णय पाकिस्तानच्या विद्यापीठाकडून घेण्यात आला.
संस्कृत वारसा समृद्ध आहे
LUMS येथील गुरमणी सेंटरचे संचालक यांनी सांगितले की पाकिस्तानला समृद्ध संस्कृत वारसा आहे, परंतु तो बऱ्याच काळापासून दुर्लक्षित आहे. त्यांनी स्पष्ट केले की पंजाब विद्यापीठाच्या ग्रंथालयात संस्कृत पांडूहस्तलिखितांचा एक मोठा आणि महत्त्वाचा संग्रह आहे. हा संग्रह देशाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु दुर्दैवाने तो अनेकदा दुर्लक्षित केला गेला आहे.
तसेच 1930 च्या दशकात प्रसिद्ध विद्वान जे.सी.आर. वूलनर यांनी अनेक ताडपत्रांच्या संस्कृत पांडू लिपिहस्तलिखितांची यादी तयार केली होती. पण 1947 नंतर पाकिस्तानमधील कोणत्याही स्थानिक विद्वानाने या संग्रहावर गांभीर्याने काम केलेले नाही. या पांडु हस्तलिखितांचा वापर बहुतेक परदेशी संशोधकांनी केला आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना आणि विद्वानांना संस्कृतमध्ये प्रशिक्षण दिल्यास ही परिस्थिती बदलू शकते.
या उपक्रमामागील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे असोसिएट प्रोफेसर शाहिद रशीद. ते स्पष्ट करतात की जेव्हा लोकं त्यांना विचारतात की ते संस्कृत का शिकत आहेत, तेव्हा त्यांच्या मते, संस्कृत ही संपूर्ण प्रदेशासाठी एकात्मता निर्माण करणारी भाषा आहे. ती केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण उपखंडाचा एक सामायिक सांस्कृतिक वारसा आहे.
हे एक मोठे केंद्र आहे.
शाहिद रशीद म्हणाले की, महान संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांचे गाव देखील याच प्रदेशात होते. सिंधू संस्कृतीच्या काळात पाकिस्तान हा प्रदेश लेखन आणि ज्ञानाचे एक प्रमुख केंद्र होता. त्या काळातील विचार आणि संस्कृती समजून घेण्याची गुरुकिल्ली संस्कृत भाषेत आहे. त्यांनी संस्कृतची तुलना अशा पर्वताशी केली जी काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि आजही आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे.
त्यांचे असे मत आहे की संस्कृतला कोणत्याही एका धर्माशी जोडणे योग्य नाही. ही एक अशी भाषा आहे जी प्रत्येकाची आहे आणि ती स्वीकारल्याने इतिहास आणि संस्कृतीची चांगली समज मिळू शकते. नवीन पिढीला आपल्या सामायिक वारशाशी जोडण्याच्या उद्देशाने LUMS मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
योजना काय आहे?
भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्याची विद्यापीठाची योजना आहे. महाभारत आणि भगवद्गीतेवर स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारीही सुरू आहे. तर पुढील 10 ते 15 वर्षांत पाकिस्तानमध्ये गीता आणि महाभारतात तज्ज्ञ असलेले विद्वान येऊ शकतात. हे केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक संवादातही एक मोठे पाऊल असेल.
Leave a Reply