
पुण्यातील नाना पेठ आणि रविवार पेठ परिसरात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेले आंदेकर विरुद्ध कोमकर हे रक्ताच्या नात्यातील टोळीयुद्ध आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने १९ वर्षीय आयुष कोमकरची निर्घृण हत्या केली होती. आता याच आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने पुण्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात
गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाना पेठ भागात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर समर्थकांनी हत्या केली. विशेष म्हणजे, बंडू आंदेकर हे कल्याणी कोमकर यांचे वडील आहेत, मात्र रक्ताच्या नात्यानेही या संघर्षाची धार कमी झाली नाही. “माझ्या वडिलांनीच (बंडू आंदेकर) माझ्या मुलाचा बळी घेतला,” असा गंभीर आरोप कल्याणी कोमकर यांनी केला आहे. कल्याणी कोमकर यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ आणि नारायण पेठ) मधून शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली आहे. आंदेकर कुटुंबाची दहशत मोडून काढण्यासाठी आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण राजकारणात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन
नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याणी कोमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना थेट आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत आंदेकर कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊ नये. बंडू आंदेकर यांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. जर अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिली, तर मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन,” असा इशारा कोमकर यांनी दिला आहे.
बंडू आंदेकर म्हणतात की आम्ही पुण्याचा विकास केला, मग या विकासासाठी त्यांनी माझ्या निष्पाप मुलाचा बळी घेतला का? विकासाच्या नावाखाली लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? ज्या बापाने आपल्याच मुलीचे कुंकू पुसण्याचा आणि तिच्या मुलाला मारण्याचा कट रचला, तो समाजाचा काय विकास करणार? असे सवाल कल्याणी कोमकर यांनी केले आहेत.
उच्च न्यायालयात दाद मागणार
बंडू आंदेकर यांनी कोर्टाकडून परवानगी मिळवून उमेदवारी अर्ज भरला. मात्र, अर्ज भरताना त्यांनी मोठी घोषणाबाजी आणि रॅली काढली. हा एक प्रकारे प्रचाराचाच भाग होता आणि त्यांनी न्यायालयीन अटींचे उल्लंघन केले आहे. आंदेकरांना दिलेली निवडणूक लढवण्याची परवानगी रद्द व्हावी, यासाठी त्या उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेणे चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे, असे कल्याणी कोमकर यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी केवळ आयुषच्या हत्येचाच उल्लेख केला नाही. तर विजय निंबाळकर, गणेश काळे आणि निखिल आखाडे यांच्या हत्यामागेही आंदेकर टोळीचाच हात असल्याचा पुनरुच्चार केला. पुण्यातील गुन्हेगारीचा हा चेहरा आता जनतेसमोर उघडा पडला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने आंदेकरांना ताकद देऊ नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जर गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाला, तर सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल. अजित दादांनी त्यांचा अर्ज फेटाळला नाही, तर माझ्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही,” असे त्या भावूक होऊन म्हणाल्या.
मी आज एका आईच्या भूमिकेतून लढतेय
माझे पती गणेश कोमकर सध्या कारागृहात आहेत. मात्र, कल्याणी यांच्या मते त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. तरीही ते तुरुंगातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मी आज एका आईच्या भूमिकेतून लढतेय. आंदेकरांच्या दहशतीमुळे अनेक आया-बहिणींनी आपली मुले गमावली आहेत. ही दहशत संपवण्यासाठीच मी शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग २३ मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कल्याणी कोमकर म्हणाल्या.
Leave a Reply